अलिबाग तालुक्यातील निसर्गसंपन्न अशा थळ गावामध्ये गावाच्या विकासासाठी होतकरु तरुणांनी एकत्र येवून निसर्ग सुंदर थळ सामाजिक संस्थेची २० ऑगस्ट २०२३ रोजी स्थापना केल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी योगेश घरत यांनी दिली.
थळचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे व वाढवणे, स्वच्छ्ता मोहिम राबवणे, पर्यटनला चालना देणे, गावातील नवतरूणांना व्यवसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देणे अशी अनेक उदि्दष्ट संस्था जोपासणार असल्याचेही सेक्रेटरी श्री. योगेश घरत व सल्लागार डॉ.राजाराम हुलवान यांनी सांगितले.
काही महिन्यापूर्वी थळ गावातील तरुण मंडळी एकत्र येवून समुद्र किना-याची सफाई करणे, झाडे लावणे, गावाची स्वच्छता करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यातूनच पुढे अशा प्रकारची संस्था स्थापन करण्याचे ठरविले. आणि ती सत्यात उतरविण्यासाठी थळमधील तरुण, वयस्कर मंडळी एकत्र आले.
रविवारी संस्था स्थापनेच्या वेळी थळ डोंगरी येथे ५०१ झाडे लावून या वृक्षांच संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सभासद आणि गावातील सुमारे १०० नागरिक उपस्थित होते.



