दि.१८ मार्च २०२३ रोजी नेहुली क्रिडा संकुल येथे पहील्या अलिबाग कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात खेळाडु,पालक आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये झाले.
माणुसकी प्रतिष्ठान, रायगड प्रिमियर लिग, आणि सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेतील खेळाडुंचा उत्साह ओसंडून वहात होता. सर्व मैदानी स्पर्धा लक्षवेधी होत्या त्यामध्ये कु.मिहीर व कथा वाडकर यांची कामगिरी लक्षणीय ठरली हे दोन्ही खेळाडु अॅथलॅटीक्स स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरले.
या मैदानी स्पर्धेचे यशस्वी आयोजन यतिराज पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बिनचुकपणे केले.
महोत्सवातील पहील्या दिवशीचा दुसरी स्पर्धा लाठी काठी या क्रिडा प्रकाराच्या स्पर्धेचे उद्घाटन आर. सी. एफ. चे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेतील स्वच्छता पाणी समन्वयक जयवंत गायकवाड, माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रायगड प्रिमियर लिग सचिव जयंत नाईक, सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सौ.सुप्रिया जेधे , रायगड प्रिमियर लिग चे सहसचिव संदीप जोशी , वरसोली क्रिकेट मंडळाचे संदेश गुंजाळ उपस्थित होते.
या स्पर्धा प्रसंगी लाठीअसोशियन अलिबाग रायगड चे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण मसाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. लाठी काठी क्रिडाप्रकारातील आंतराष्ट्रीय पंच सौ.प्रियांका संदेश गुंजाळ तसेच राष्ट्रीय पंच शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, श्री माही खबीस, श्री रूपेश शेळके यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
लाठीकाठी स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातील 15 शाळामधिल 85 विद्यार्थी सहभागी झाले होते. भोनंग येथील सहभागी विद्यार्थांनी आपल्या कौशल्याने विषेश दाद मिळवली. प्रचंड संख्येने उपस्थित प्रेक्षक वर्गाने सतत उत्साही प्रोत्साहन देऊन छोट्या मोठ्या शाळकरी खेळाडुंना शाबासकी दिली.
पहिल्या अलिबाग कला आणि क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या खेळाडु, प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे उर्वरित तिनही दिवसांचे कार्यक्रम अभूतपूर्व यशस्वी ठरतील याची खात्री आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
दि.१९ मार्च २०२३ रोजी पहीला क्रिडा प्रकार सायकलिंग सकाळी ६:३० वाजता अलिबाग समुद्र किनारी, दुसरा सांस्कृतीक प्रकार भजन, नृत्य, एकपात्री प्रयोग साई मंदिर नेहुली येथे सकाळी ८:०० वाजता, आणि तिसरा क्रिडा प्रकार महिला लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धा खांनाव सकाळी ९:३० वाजता सुरु होणार आहे. असे विविध क्रिडा प्रकार रविवारी होणार आहेत.



