कुसुंबळे वार्ताहर,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महान येथे शिवजयंती उत्सव मंडळ महान तसेच माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मरीआई मंदिर महान येथे मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाला. संस्थापक, अध्यक्ष माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर डॉ. राजाराम हुलवान, माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग शाखा संपर्क प्रमुख ॲड.भूपेंद्र पाटील, तेजस्विनी फाऊंडेशन संस्थापिका जिविता पाटील, माणुसकी सदस्य एकनाथ राठोड सिस्टर रोशनी मंजुळे, रोहन कांबळे , गणेश कनोजे , शिर्के ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते. महान गाव हे अलिबाग- रामराजपासून खूप अंतरावर दुर्गम भागात असल्याने व रहदारीची साधने देखील क्वचितच असतात त्यामुळे गावकऱ्यांना काही एक आजार असेल तर रामराज किंवा अलिबागला यावे लागते. अशा दुर्गम भागात येवून मोफत आरोग्य तपासणी करण्याचे कार्य माणुसकी प्रतिष्ठान तर्फे गेली 3 वर्षे केले जाते. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे पोहोचून सेवा देण्याचे कार्य माणुसकी प्रतिष्ठान कडून होत राहील असे आश्वासन डॉ. राजाराम हुलवान यांनी गावकऱ्यांना दिले. यावेळी जवळ जवळ ९१ लाभार्थ्यांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला. सर्दी, खोकला, ताप, ॲसिडीटी, अंगदुखी, त्वचेचे आजार, शुगर इ. आजारांवर या शिबिराच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.
डॉ. राजाराम हुलवान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दुर्गम भागात येवून तुमची सेवा करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्य समजतो असे सांगून परिसर स्वच्छता, कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती, आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन केले. जिविता पाटील यांनी जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेत कार्य करणाऱ्या माणुसकी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना माणुसकी प्रतिष्ठानकडून दरवेळी काहीतरी नवीन शिकण्याची व नवीन अनुभव घेण्याची संधी मिळते आणि खऱ्या अर्थाने समाजसेवा केल्याचा आनंद मिळतो असे मत व्यक्त करीत उत्तम जीवन जगण्यासाठी चांगले आरोग्य महत्त्वाचे असते असे मत व्यक्त केले. ॲड. भूपेंद्र पाटील यांनी माणुसकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याची ओळख उपस्थितांना दिली तसेच देशाचे उज्ज्वल भविष्य हे तरुणांच्या हाती आहे त्यामुळे अशा सामाजिक कार्याचे नियोजन करणाऱ्या गावातील तरुण युवकांचे विशेष कौतुक केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवजयंती उत्सव मंडळ महान यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन रोहन कांबळे यांनी केले.



