जलतरणपटू सागर कांबळे याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या १४ तास ४८ मिनिटात जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी ( किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात सर केली. या माध्यमातून या युवा जलतरणपटूने आत्तापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एका वेगळ्या क्रीडाप्रकारात देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे.
इंग्लिश खाडी ३४ कि.मी. ची लांबी असणारी १४ तास 48 मिनिटात पूर्ण केली आणि एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. याबरोबरच अनेक स्पर्धांमध्ये स्वीमिंग कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेत अनेक पदकांची कमाई केली आहे.
याबाबत पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जलतरणपटू सागर कांबळे यांनी सांगितले, की शालेय जीवनापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली. यातूनच अनेक शाळा, महाविद्यालयांच्या स्वीमिंग कॉम्पिटीशन गाजवल्या. मात्र, इंग्लिश खाडी सतत खुणावत होती. याबद्दल अनेकांकडून ऐकले होते. इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यामधील अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. ही खाडी अत्यंत कमी तापमानात सर करणे मोठे आव्हानात्मक होते. अखेर अवघ्या १४ तास ४८ मिनिटात ही खाडी सर करण्यात यश मिळाले. इंग्लिश खाडी सर करण्याचे स्वप्न गेल्या काही वर्षांपासून पाहत होतो. लाटांचा चढ उतार, वारे, थंडी असे अडथळे येत असतानाही ३४ किलोमीटरचे अंतर पार करण्यात यशस्वी झालो. आपण हे अंतर यशस्वी पार करू, असा आत्मविश्वास सुरुवातीपासून होता. हा खडतर जलप्रवास होता.
सागर हा काळेवाडी येथे वास्तव्यास आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला जलतरणाचे वेड लागले. तेव्हापासून अनेक शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने चमकदार कामगिरी केली.



