Kridavedhnews

तांदूळ व डाळ महोत्सवात 4 लाख रुपयांची उलाढाल महिला स्वयंसहाय्यता समूहांकडून खरेदीला पुणेकरांची पसंती

पुणे, दि. 11: पुणे जिल्हा परिषद व उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवात एकूण 4 लाख 3 हजार 200 रुपयांची विक्रीची उलाढाल झाली. पुणेकरांनी महोत्सवात खरेदीला पसंती दिली, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद येथे 9 व 10 जून असे दोन दिवस तांदूळ व डाळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीअभियान’मार्फत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता.

महोत्सवामध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित इंद्रायणी तांदूळ, आंबेमोहोर, कोलम, काळा तांदूळ, काळा गहू आणि उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर डाळ व  राजमा विक्रीस ठेवण्यात आला होती. पुणे जिल्ह्यातील एकूण 10 महिला स्वयंसहायताकडून दोन दिवसांमध्ये 1 लाख 67 हजार 700 रुपये एवढी उलाढाल झालेली आहे. तसेच 250 किलोग्रॅम तांदळाची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 5  महिला स्वयंसहायता समूहांची 2 लाख 35 हजार 500 रुपयांची डाळीची विक्री झाली आहे.

या महोत्सवास भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाचे संचालक राघवेंद्र सिंग, ‘उमेद’, नवी मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उस्मानाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) विजय कुमार मुळीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी महोत्सवास भेट देऊन खरेदी केली.

या महोत्सवाचे यशस्वी आयोजनामागे उमेद पुणेचे अधिकारी व कर्मचारी व उमेद उस्मानाबादचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

District Information Office, Pune

Ground Floor, New Central Building,
Opposite Sasoon Hospital,
Pune-411 001
Phone: 020/26121307

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio