मागील महिन्यात गोव्याच्या लोक विश्वास प्रतिष्ठान या नामवंत आशा खूप मोठ्या मतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये जाण्याचा योग आला होता. जवळजवळ 400 पेक्षा जास्त मतिमंद विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. हा अनुभव खुप वेगळेपण देऊन गेला. जवळ जवळ एक पूर्ण दिवस परमेश्वराच्या लेकरांच्या सान्निध्यात व्यतीत करता आला. बरेच काही कमी असताना देखील त्यांच्या चेहर्यावरचा आनंद एक वेगळाच होता. तो बराच काही शिकवून गेला. या दोन महिन्यात संस्थेबरोबर, संस्थेच्या संचालकांबरोबर खूप घट्ट व आपुलकी पूर्ण स्नेहरज्जू तयार झाला व त्यांनी त्यांच्यात आम्हाला सामावून घेतले आहे. त्यांनी 18 वर्षावरील मतिमंद मुलांसाठी निवासी शाळा चालू करण्याचा खूप मोठा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला असून या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी आमची निवड केली आहे. खरे तर हा आमचा मोठा गौरवच झाला. पण आम्हाला अशा मोठ्या संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव नाही व तेवढा आमचा बौद्धिक आवाका व वकूबही नाही. पण चांगल्या कामाला हातभार लावता येतो आहे म्हणून आम्ही जमेल तेवढे सहकार्य करत आहोत. प्रथमेश मुळे गेली तीस वर्षे आयुष्यातील उमेदीची वर्षे व्यतीत झाली. व ही जबाबदारी पेलण्याची शारीरिक, मानसिक सक्षमता पण राहिली नाही. तथापि, मतिमंद मुलांच्या विकासाचे काम करताना अनेक थोरामोठ्या व्यक्तींचे बरोबर स्नेह जमुन आला. त्याचा उपयोग मार्गदर्शन, मदत, आर्थिक हातभार मिळवून देण्यासाठी करत आहोत. परमेश्वराच्या मुठीत आमची किती वर्षे शिल्लक आहेत माहिती नाही. आहोत तोपर्यंत तरी या देवाच्या लेकरांसाठी उर्वरित आयुष्य समर्पित करण्याचा निश्चय केला आहे. निस्वार्थ व निर्व्याज अपेक्षा विरहित काम करण्याची आमची प्रबळ इच्छा या मंडळींना खूप भावली व आज या संस्थेच्या सचिव सविता देसाई यांचा आलेला संदेश मुद्दाम पाठवत आहे. तो पुरेसा बोलका आहेच. (🙏आज आपण पायावर माथा टेकवण्यासारखे पायच नाही म्हणतो.पण तुमच्यासारखी संवेदनशील व्यक्ती बघीतल्या की संपूर्ण नतमस्तक होण्यासारखे थोडे तरी चरण देवाने शिल्लक ठेवले असं प्रांजळपणे व्यक्त करायला मला आवडेल. बा.भ. बोरकरांच्या भाषेत सांगायचे तर “देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती ।वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती।।. – सविता देसाई )
आमच्या समोर जयप्रकाश जी झेंडे, पुणे (उमेद परिवार) , डॉ. ज्ञानदेव चोपडे. नाशिक, अनिल जी जोशी, दिल्ली, शोभा नाखरे, मुंबई, कुलभूषण बिरनाळे, पुणे, आदरणीय विनोद जी तलगेरी, मुंबई, विलासराव मराठे, अमरावती, अनुप प्रियोळकर, गोवा यांच्यासारखे व अन्य बरेच दीपस्तंभ आहेत. आदर्श आहेत. त्यांच्याच पावलाचा मागोवा घेत घेत वाट पुसत पुसत काम चालू करत आहोत. या प्रयत्नाला आपले शुभाशीर्वाद राहोत ही विनम्र प्रार्थना. आमची अशी तीव्र इच्छा आहे की आणखी एक तरी मुलगा प्रथमेश सारखा इंटरनॅशनल सेलिब्रिटी पर्यंत न्यावा. परमेश्वरी इच्छा काय आहे माहित नाही. संवादाचा पूल अगदी मोकळेपणाने बांधला आहे. सहयोग मिळावा.
– प्रकाश दाते
शारदा दाते
इचलकरंजी



